कडाक्याच्या उन्हात कलिंगडाचा गारवा; दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात   

पुणे : उन्हाळ्याला सुरूवात झाली की, ग्राहकांकडून कलिंगडाला मागणी वाढत असते. तपमानाचा पारा वाढताच कलिंगडाला मागणी वाढली आहे. मात्र बाजारात रोज ८० ते १०० टन कलिंगडाची आवक होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दरही ४ ते ५ रूपयांनी कमी आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगाम सर्वसामान्यांनाही गारेगार कलिंगडाचा मनसोक्त अस्वाद घेता येणार आहे. 
 
मार्केटयार्डातील फळबाजारात पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातून कलिंगडाची आवक होत आहे. येत्या काळात आणखी आवक वाढणार असल्याने रोजची आवक १५० ते २०० टनापर्यंत जाणार असल्याचा अंदाज आहे. आवक वाढणार असली, तरी मागणीतही लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे दर स्थिर राहतील. सद्य:स्थितीत बाजारात दाखल होणार्‍या कलिंगडाचा दर्जा उत्तम असल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
 
सुपेकर म्हणाले. रमजाणचे उपवास सुरू असल्याने कलिंगडाच्या मागणीत वाढ झाली आहे. ही वाढलेली मागणी उपवास सुरू असेपर्यंत कायम असणार आहे. बाजारात सोनिया प्लस, सिंबा, मेलोडी, जन्नत, मन्नत, शुगर क्विन आदी प्रकारच्या कलिंगडाची आवक होत आहे. त्यास प्रतिकिलोला ८ ते १३ रूपये दर मिळत आहे. मागील वर्षी या काळात घाऊक बाजारात कलिंगडाला १२ ते १६ रूपये दर मिळाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दर कमी आहे. कलिंगडाचा हंगाम मे अखेरपर्यंत असणार आहे. घरगुंती ग्राहकांसह फ्रुट डिश, ज्युस विक्रेते, हॉटेल चालकांकडून कलिंगडाला मोठी मागणी होत आहे. यंदा कलिंगडासाठी पोषण वातावरण आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात आवक वाढत राहणार असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता कमीच असल्याचेही सुपेकर यांनी स्पष्ट केले. 

बंगळुरू येथून कलिंगडाची आवक 

मार्केटयार्डातील फळ बाजारात बंगळुरू येथून कलिंगडाची रोज ४० ते ५० टनाची आवक होत आहे. त्यास घाऊक बाजारात १२ ते १३ रूपये दर मिळत आहे. फ्रुट डिश व ज्युस विक्रेते या कलिंगडाची खरेदी करत आहेत. बंगळुरू येथून नामधारी नावाचे कलिंगड येत आहे. येत्या काळात या कलिंगडाचीही आवक वाढणार असल्याचा अंदाज आहे. हे कलिंगड राज्यातील कलिंगडापेक्षा आकाराने मोठे आहे. हे कलिंगड चवीला जवळपास सारखेच असल्याचेही पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले. 

खरबुजाच्या दरात घट 

मागील काही दिवसांपासून बाजारात खरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र त्या तुलनेत मागणी होत नसल्याने दरात घट झाली आहे. बाजारात रोज ४० ते ६० टनाची आवक होत आहे. त्यास प्रतिकिलोला १० ते १८ रूपये दर मिळत आहे. आवक अशीच कायम राहिल्यास खरबुजाच्या दरात वाढ होण्याऐवजी आणखी घट होऊ शकते, असा अंदाजही पांडुरंग सुपेकर यांनी व्यक्त केला. 
 

Related Articles